Monday, January 23, 2017

आपले सण

आपले सण
 
    ऋषीपंचमी (भाद्रपद शुदध पंचमी)
    मोक्षदा एकादशी
    श्री गणेश चतुर्थी (भाद्रपद शुध्द चतुर्थी)
    कार्तिकी एकादशी (कार्तिक शुध्द एकादशी)
    हरतालिका ( भाद्रपद शुध्द तृतीया)
    पिठोरी अमावास्या (श्रावण वद्य अमावास्या)
    बैल पोळा (श्रावण वद्य अमावास्या)
    मंगळागौर ( श्रावण महिन्यांतील प्रत्येक मंगळवारी)
    गोकुळ अष्टमी (श्रावण वद्य अष्टमी)
    राखी पौर्णिमा (श्रावण शुध्द पौर्णिमा)
    नारळी पौर्णिमा ( श्रावण शुध्द पौर्णिमा)
    नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)
    पालखी सोहळा
    आषाढी एकादशी (आषाढ शुध्द एकादशी)
    वटपौर्णिमा (ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा)
    अक्षय (अक्षय्य) तृतिया
    गुढीपाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा)
    रंगपंचमी (फाल्गुन वद्य पंचमी)
    धूलिवंदन
    होळी पौर्णिमा (फाल्गुन शुध्द पौर्णिमा)
    महाशिवरात्री (माघ वद्य चतुर्दशी)
    मकरसंक्रांत
    भोगी


ऋषीपंचमी (भाद्रपद शुदध पंचमी)
भारतात जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी, निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून ऋषीपंचमी हा सण साजरा करतात.

सप्तर्षी, अरूंधती व गणपती यांची या दिवशी पूजा करतात. सप्तर्षींच्या सात, अरूंधतीची एक व गणपतीची एक अशा नऊ सुपा-या मांडून पूजा करतात. बायका या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काहीही खात नाहीत. तसेच गाईचे दूध पीत नाहीत. असे करणे जेव्हा शक्य नसेल तेव्हा फक्त उपवास करतात. खेडेगावातील बायकांना हा उपवास शास्त्रोक्त पध्दतीने करता येतो कारण घराच्या मागील भागात भाजीपाला, वेल इत्यादी लावलेले असतात. त्यांचा ह्या दिवशी उपयोग होतो. या दिवशी पाच प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्या जेवणाच्या वेळी गणपतीला नैवेद्य दाखवून मग जेवण करण्याची पध्दत आहे.


मोक्षदा एकादशी
कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केला ती गीता ! तो दिवस मार्गशीर्ष शुध्द एकादशी हा होता. म्हणून या दिवसाला गीताजयंती असे म्हणतात. गीतेला आपण मोक्षदायिनी मानतो. म्हणून मग या एकादशीला मोक्षदा एकादशी असेही गौरविले गेले. ही मोक्षदा एकादशी आचरल्याने पितरांचा उध्दार होतो, त्यांना मोक्ष मिळतो, अशी परंपरेची श्रध्दा आहे. त्याची एक कथा आहे. ती कथा अशी - चंपक नगरीच्या वैखानस राजाच्या स्वप्नात एकदा त्याचे पितर आले. त्यांनी आपण सोसत असलेल्या नरकयातनांचे राजाकडे वर्णन केले. यामुळे दु:खी झालेल्या राजाने एका ऋषीला यावर उपाय सांगण्याची विनंती केली. त्या ऋषीने मोक्षदा एकादशी करण्याचा सल्ला राजाला दिला. त्याप्रमाणे राजाने मोक्षदा एकादशी केल्याने त्याच्या पितरांना मोक्ष मिळाला.

ही एकादशी निर्जला एकादशी सारखीच अतिमहत्त्वाची मानली जाते. म्हणजे ही एकादशी केली तर इतर सर्व एकादश्या केल्याचे पुण्य लाभते अशी लोक श्रध्दा आहे.




श्री गणेश चतुर्थी (भाद्रपद शुध्द चतुर्थी)
महाराष्ट्रातील सर्वात मोठा व आगळावेगळा सण म्हणजे गणपती. या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत धामधुमीने साजरा केला जातो. हा उत्सव दहा दिवसांचा असतो. गणपती ही ज्ञानाची देवता. गजानन हा विघ्नहर्ता मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याचा प्रघात आहे. कोकणातील हा सर्वात महत्त्वाचा सण असल्यामुळे जगाच्या पाठीवर असलेला कोणताही कोकणी माणूस या उत्सवासाठी आपल्या गावी जाण्यास उत्सुक असतो. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी खास बसेसची सोय केली जाते.

या दिवशी मुख्यतः नारळ व गूळ यांच्या सारणाचे, तांदुळाच्या उकडीचे मोदक करतात.

सार्वजनिक गणपती उत्सवामधे गणेशाच्या भव्य मूर्ती चौकाचौकातून बसवितात व त्याची भव्य आरास करतात. लोक रात्रीच्या वेळी हे देखावे पहाण्यासाठी रस्तोरस्ती हिंडतात. संगीत, नृत्य, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नाटके वगैरे करमणुकीचे कार्यक्रम आखले जातात.

सार्वजनिक गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. काही लोकांकडे दीड दिवसांचा गणपती असतो तर काही जणांकडे पाच दिवस असतो. तर काहीजणांचा गणपती गौरींबरोबर सातव्या दिवशी जातो.


कार्तिकी एकादशी (कार्तिक शुध्द एकादशी)
वर्षातून दोन महाएकादशी असतात. पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते . आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते.

या दिवशी लोक उपवास करतात. भजन-कीर्तनात दिवस घालवितात. विठ्ठलाची महापूजा करतात.



हरतालिका ( भाद्रपद शुध्द तृतीया)
हरतालिका हे व्रत पार्वतीने शंकर आपल्याला पती म्हणून मिळावा यासाठी केले होते असे मानले जाते. तेव्हांपासून आपल्याला जोडीदार मनासारखा व चांगला मिळावा म्हणून कुमारिकांनी हे व्रत करावे असा प्रघात आहे आणि लग्नानंतर मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून आणि जन्मोजन्मी असाच जोडीदार मिळावा म्हणून नंतरही स्त्रिया हे व्रत करतात. मंगळागौरीच्या पूजेप्रमाणेच हिरव्या बांगडया २, कंगवा, आरसा, कुंकू, करंडा इ. साहित्य आणून, शंकराची प्रतिमा म्हणून वाळूची पिंड करून पूजा करतात. सात प्रकारची प्रत्येकी सात सात पाने गोळा करून ती शंकराला वहातात. त्यापैकी मुख्य पान म्हणजे रूईचे व बेलाचे पान. ही दोन्ही पाने ह्या पूजेत आवश्यकच आहेत.

पूजा झाल्यावर हरतालिकेची आरती म्हणतात व कहाणी वाचतात. त्यादिवशी बायका कंदमुळाशिवाय काहीही खात नाहीत. दिवसभर पाणीसुध्दा पित नाहीत. रात्री बारा वाजता रूईच्या पानावर मध घालून चाटतात. दुसरे दिवशी आंघोळ करून हरतालिकेची आरती करून उपवास सोडतात. हरतालिकेच्या दिवशी बायका एकत्र येऊन रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात खेळ, फुगडया, गाण्याच्या भेंडया खेळतात. या दिवशी स्त्रिया इतर स्त्रियांना सौभाग्यवाणे देतात. दुस-या दिवशी उत्तरपूजा करतात.



पिठोरी अमावास्या (श्रावण वद्य अमावास्या)
या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले. अशा प्रकारे संतति रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठेरी अमावास्या करून देते.म्हणून ही अमावास्या महत्त्वाची आहे.

या दिवशी मुलाबाळांच्या वंशवृध्दीकरिता पूजा करतात. या दिवशी सवाष्ण ब्राम्हण ही जेवावयास घालतात. पुरणावरणाचा महानैवेद्य दाखवतात.



बैल पोळा (श्रावण वद्य अमावास्या)
भारत हा शेतीप्रधान देश आहे. पारंपारिक पध्दतीने शेतीसाठी बैलाची अनमोल मदत घेतली जाते. बैल वर्षभर शेतात राबत असतो. त्याच्या कष्टामुळे धनधान्य मिळते. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्याने केलेल्या कष्टाचे स्मरण व्हावे म्हणून वर्षातून एक दिवस बैलपोळा साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे हा सण शेतकरी साजरा करतात. या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालून सजवतात. शिंगाना बेगड लावतात. पाठीवर झूल घालून सजवतात. बैलांना वाजत गाजत मारूतीच्या दर्शनाला नेतात. त्या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती देतात. संध्याकाळी बैल वाजत गाजत आले की त्यांची पूजा करतात व त्यांना पुरणपोळी खायला देतात.

ज्यांचा शेती हा व्यवसाय नाही ते लोक या दिवशी मातीच्या बैलाच्या मूर्ती विकत आणून पाटावर गहू पसरून त्यावर बैल मांडून त्यांची पूजा करतात. जेवणात पुरणपोळी हे प्रमुख पक्वान्न केले जाते.




मंगळागौर ( श्रावण महिन्यांतील प्रत्येक मंगळवारी)
मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा-शंकराची पूजा. पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात.

नवविवाहित स्त्रिया या दिवशी न्हाऊन, सोवळे नेसून पूजेला बसतात. पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात.

या पूजेकरिता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचे पूजेचे साहित्य, बुक्का, अक्षता, पाच खारका, पाच सुपा-या, पाच बदाम, पाच खोब-याच्या वाटया, सोळा प्रकारची पत्री (पाने), दोन वस्त्र, आठ वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, सोळा काडवाती, तुळशीची पाने, केळी किंवा पेरूचा नैवेद्य, पंचामृत, दुधाचा नैवेद्य, जानवे, सोळा विडयाची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, शक्य असल्यास केवडयाचे कणीस, एक नारळ, कापड, हळद-कुंकू इ.साहित्याची गरज असते.

ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदीकुंकवासाठी बोलावतात. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाने ओटी भरतात. रात्रीसाठी पोळया, मटकीची उसळ, वाटली डाळ, करंज्या, चकल्या, लाडू वगैरे फराळाचे जिन्नस करतात व सर्वांना जेवायला बोलवतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात.




गोकुळ अष्टमी (श्रावण वद्य अष्टमी)
राम, कृष्ण, विष्णू व शंकर ही भारतीयांची आराध्य दैवते आहेत. श्रीकृष्ण तर त्याच्या गोकुळातील बाललीला, यमुनेवरील रासलीला आणि भगवतगीतेतील उपदेशांमुळे सर्वांचे आवडते दैवत झाला आहे. त्या श्रीकृष्णाच्यासाठी हा सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला तो दिवस म्हणजे गोकुळ अष्टमी होय.

या सणामागील पौराणिक कथा अशी की श्रीकृष्णाचा मामा कंस. कंसाने प्रजेला खूप छळले. श्रीकृष्णाच्या आई-वडिलांना त्याने तुरुंगात ठेवले कारण त्यांना होणा-या मुलांपैकी एकजण कंसाचा वध करणार अशी आकाशवाणी झालेली होती. कृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आई-वडिलांना बंदिवासातून मुक्त केले. ही कथा सर्वज्ञात आहेच. पुढे याच श्रीकृष्णाने कौरव-पांडव युध्दात पांडवांची बाजू घेऊन कौरवांचा पराभव केला. या गोष्टीचे स्मरण व्हावे म्हणून भारतात सर्व ठिकाणी गोकुळ अष्टमी हा सण उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो ते सर्वजण ह्या दिवशी उपवास करतात. रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतात, काल्याचे कीर्तन करतात व सुंठवडा प्रसाद म्हणून वाटतात. ह्या दिवशी पाळणा फुलापानांनी सजवून तयार करतात. बळीराम, श्रीकृष्ण यांच्या मूर्ती तयार करून त्या पाळण्यात निजवतात. त्यास तोडे, साखळया असे दागिने घालतात. त्यांची पूजा करतात.




राखी पौर्णिमा (श्रावण शुध्द पौर्णिमा)
हाच दिवस राखीपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. भावाने आपले रक्षण करावे असा या राखी बांधण्यामध्ये हेतू असतो. व्रतबंध झालेले ब्राह्मण लोक या दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करतात. याच दिवशी लोक श्रावणी करतात. या दिवशीचे मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात. तसेच नारळाच्या/ खोब-याच्या वडया, नारळाची बर्फी, नारळाच्या करंज्या वगैरे पदार्थ करून हा सण साजरा करतात.



नारळी पौर्णिमा ( श्रावण शुध्द पौर्णिमा)
समुद्राकाठी रहाणा-या प्रामुख्याने कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळयात समुद्र खवळलेला असतो. बोटी, जहाजे वगैरैची ये-जा या काळात बंद असते. जलदेवतेचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात, या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्राला नारळ अर्पण करताना ताम्रनाणी नारळास बांधून नारळ समुद्रात सोडतात. या दिवसापासून मच्छिमार लोक आपल्या होडया घेऊन मच्छिमारीसाठी समुद्रात जायला सुरुवात करतात.



नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)
भारतात नाग-साप यांना देव मानले जाते. काही नाग मानवाला उपकारक तर काही विषरी नाग-साप अपकारक मानले जातात. कदाचित त्यांच्याबाबत असलेल्या भितीपोटी ही कल्पना आली असावी. नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली आहे.या सणामागची पौराणिक कथाअशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी, दुष्ट सर्प होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुध्दा सर्व काही भस्मसात होई. श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुदध पंचमी (नागपंचमी).

तेव्हापासून लोक नागाची पूजा करुन नागाला लाह्या, दूध वाहतात. नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुध्दा पूजा करतात. अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतात. पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात. नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात. नवनागांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१) अनंत २) वासुकी ३) शेष ४) पद्मनाभ ५) तक्षक ६) कालीया ७) शंखापाल ८) कंषल ९) धृतराष्ट्र

नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे, विळीने चिरणे, तळणे इत्यादी निषिध्द मानले आहे. कारण वरील क्रीया करताना अनावधानाने साप किंवा नाग यांना इजा पोरण्याची शक्यता असते असे मानले जाते.
नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रीया हातावर मेंदी काढतात व नवीन बांगडया भरतात. खेडेगावातून झाडाला दोर बांधून मुली झोके घेण्याचा खेळ खेळतात.



पालखी सोहळा

महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर या महान संताशी एकादशीचा अतूट संबंध जोडला गेलेला आहे. एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी बरोबर चालत पंढरपूरला नेतात. या दिंडीत सहभागी होणा-यांना वारकरी म्हटले जाते. विठ्ठलाचे भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी व टाळ, झांजांच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूर पर्यंत चालत नेतात. गळयात तुळशीच्या माळा घालतात व कपाळी गंध लावतात. एकादशीचे दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रभर या दिवशी उपवास केला जातो. देवाला फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. गावोगावच्या मंदिरात भजन-कीर्तने होतात. महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण होय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा सण होय.



आषाढी एकादशी (आषाढ शुध्द एकादशी)
या सणामागची पौराणिक कथा अशी की 'मृदुमान्य' नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करुन 'तुला कोणाकडूनही मरण येणार नाही' असा वर शंकराकडून मागून घेतला. पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला. तेव्हा ब्रम्हा, विष्णू, महेश हे गुहेत लपून बसले. मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता. त्यामुळे तीन दिवस झाले तरी देवांना बाहेर पडता येईना. शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली. तीच ही एकादशी होय. तिने मृदुमान्याला ठार मारले. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकाचे वाचन, स्वत:चे आचरण शुध्द करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा तत्सम नियम करतात व चार महिने ते न चुकता पाळतात. या दिवशी उपवास करुन पुढील चार महिन्यात जे काही नियम पाळावयाचे असतील त्याविषयी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्याबद्दल श्री महाविष्णूची प्रार्थना करतात. या दिवशी लोक गंगेकाठी स्नान करतात. पूजेच्या वेळी एक हजार किंवा एकशेआठ तुळशी विष्णूला वहातात. सारा वेळ भजन-पूजनांत घालवतात.



वटपौर्णिमा (ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा)
भारतातील सर्वत्र आढळणा-या वृक्षांपैकी एक महत्त्वाचा वृक्ष म्हणजे वड. या वृक्षाशी निगडीत असलेला हा सण आहे. या सणामागची पौराणिक कथा अशी की सावित्री या पुण्यवान व पतिपरायण स्त्रीने आपल्या पतीचे - सत्यवानाचे प्राण परत मिळवण्याकरिता, प्राण घेऊन जाणा-या यमराजाला आपल्या भक्तीने व युक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजसुध्दा बायका वडाची पूजा करतात.

आपले सौभाग्य मरेपर्यंत अबाधित रहावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना स्त्रिया देवाला या दिवशी करतात. म्हणून सौभाग्याचे लक्षण असेलेल्या हिरव्या बांगडया, शेंदूर, बुक्का, हळद-कुंकू, फुले, अक्षता, एक गळेसरी वडाच्या पूजेकरिता घेतात. याशिवाय अत्तर, कापूर, पंचामृत, वस्त्र, विडयाची पाने, सुपारी, पैसे, गूळ, खोब-याचा नैवेद्य, दुर्वा इ. साहित्य घेतात. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करतात. हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून त्याची पूजा करतात. शक्य असल्यास ब्राम्हण बोलवून पूजा करतात. या दिवशी बायका उपवास करतात. पूजा झाल्यानंतर वडाला तीन प्रदक्षिणा घालतात. वडाच्या बुंध्याला सूत गुंडाळतात.




अक्षय (अक्षय्य) तृतिया
अक्षय तृतिया हा सण वैशाख शुध्द तृतियेला साजरा केला जातो. या सणाला 'अक्षय तृतिया' नाव पडण्याचे कारण भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले आहे की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही’ म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतिया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते. अक्षय तृतिया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या तिथीस महत्त्व येण्याचे कारण म्हणजे हा काहींच्या मते कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभदिन भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणून अशा तिथीस स्नान, दान इत्यादी धर्मकृत्ये सांगितली जातात. या दिवशी विष्णूची पूजा, होम, दान करावे असे शास्त्र सांगते. उन्हापासून संरक्षण करणा-या छत्री, वहाणा अशा वस्तू दान करण्याची पध्दत आहे. जनमानसात मात्र हा सण जास्त करून चैत्रातील हळदीकुंकवासाठी माहीत आहे. स्त्रिया चैत्रात बसविलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी विसर्जन करतात. चैत्र महिन्यातल्या कोणत्याही दिवशी सोयीनुसार हळदीकुंकू केले जात असले तरी काही जण अक्षयतृतियेलाच हे हळदीकुंकू करून सुवासिनींना कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळीची करंजी असे खायला देतात. याशिवाय बत्तासा, मोग-याची फुले किंवा गजरे देतात आणि भिजवलेल्या हरब-यांनी त्यांची ओटी भरतात. खस किंवा वाळयाचे अत्तर लावून गुलाबपाणी शिंपडतात. हळदीकुंकवाला चैत्रगौर सजवितांना कलिंगड किंवा खरबूज कापून त्यात देवीची स्थापना करतात व फराळाचे पदार्थ करून व विविध खेळणी वगैरे मांडून ती जागा शोभिवंत करतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे इत्यादीही करतात.



गुढीपाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा)
चैत्र शुध्द प्रतिपदा हा मराठी नवीन वर्षाचा प्रथम दिवस होय. यामागील कथा अशी की प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध करुन, विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या अयोध्येला परत आले तो दिवस 'चैत्र शुध्द प्रतिपदा' हा होता. अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढया, तोरणे उभारून रामाच्या येण्याचा आनंद व्यक्त केला. म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी साजरा केला जातो. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.

हिंदू लोक कोणत्याही नवीन गोष्टीचा प्रारंभ करण्यास शुभ दिवस पहातात. या दृष्टीने वर्षातील काही ठराविक दिवस हे शुभ समजले जातात. साडेतीन मुहूर्त या नावाने ते प्रसिध्द आहेत. गुढीपाडवा हा दिवस या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन घरात रहायला जाणे, किंमती वस्तूंची किंवा स्थावराची खरेदी, सोन्याची खरेदी वगैरे सर्व गोष्टींच्यासाठी हा दिवस शुभ मानतात. या दिवशी नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो व नवे पंचांगही सुरू होते. शालिवाहन शकाची (हिंदू कालगणनेची) सुरूवात याच दिवशी झाली.

या दिवसाची सुरुवात कडुलिंबाची पाने खाण्याने करण्याची प्रथा आहे. कडुनिंबाच्या झाडाला या सुमारास नवीन पालवी फुटलेली असते. त्याची कोवळी पाने काढून त्यात गूळ, जिरे, चवीपुरते मीठ व लिंबू घालून वाटून गोळी बनवितात. सकाळी उठल्याउठल्या तोंड घुवून ती गोळी खाण्याची पध्दत आहे. कडुलिंब हा आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार अत्यंत आरोग्यकारक व कीटकनाशक आहे म्हणून ही प्रथा आहे.

या दिवशी घराच्या पुढील अंगणातील जमीन गाईच्या शेणाने सारवून पाच पांडवांच्या प्रतिकृती तयार करून त्यांच्या भोवती रांगोळी काढली जाते. या ठिकाणी गुढी उभारतात. गुढीची षोडशोपचारे पूजा केली जाते. गुढी उभारण्यापूर्वी गुढीला (काठीला) तेल लावून ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतात. त्याला हळद-कुंकू वाहतात. गुढीकरीता पितळेचे किंवा चांदीचे भांडे, कडुलिंबाचा डहाळा, साखरेची गाठी, जरीचा खण, कापड अथवा पातळ, फुलांची माळ एवढे साहित्य घेतात. काठीच्या टोकाला जरीचा खण किंवा रंगीत कापड घट्ट बांधतात व त्यावर भांडे पालथे घालतात. त्यावर कडुलिंबाचा डहाळा व गाठी घालतात. घराच्या छपरावर किंवा पुढील दर्शनी भागावर ही काठी अशातऱ्हेने बांधतात की रस्त्यावरून ती सहज दिसावी. ही रंगीत कापडने शोभणारी गुढी म्हणजे रामाच्या स्वागतासाठी उभारलेल्या शुभध्वजाची प्रतिक असते. गुढी उभारल्यावर तिला हळद-कुंकू वाहण्यात येते. घराच्या प्रवेशदाराला आंब्याची डहाळी अथवा तोरण लावतात. नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करतात.

ही उभारलेली गुढी सायंकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही उतरवतात. गावात रामाचे मंदिर असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण केली जाते. हळद-कुंकू, अक्षता वाहून मगच गुढी उतरवली जाते. या दिवसापासून ते रामनवमीपर्यंत राममंदिरात कीर्तनाला प्रारंभ होतो.

या दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटी-पूजन (सरस्वती पूजन) असते. पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वती काढून पाटीची अर्थात विद्येची पूजा केली जाते.



रंगपंचमी (फाल्गुन वद्य पंचमी)
वसंत ऋतूची चाहूल लागल्यामुळे या सुमारास झाडे नवीन पल्लवीने व विविध रंगी फुलांनी रंगीबेरंगी दिसत असतात. हवाही उष्ण झालेली असते. अशावेळी थंड पाणी अंगावर उडविणे सुखदायक असते. त्यामुळे रंगपंचमी हा सण सुरू झाला.

कुसुंबीच्या फुलांपासून काढलेल्या रंगाचे पाणी करून तसेच केशराचे पाणी करून ते एकमेकांच्या अंगावर उडविले जात असे. पेशवाईत तर हा सण शाही इतमामाने साजरा केला जात असे. रंगाच्या पिचका-या भरभरून हत्तीवरून गुलाल आणि इतर कोरडया रंगाची उधळण केली जात असे. आजकाल विविध प्रकारचे रंग पाण्यात कालवून ते एकमेकांवर उडवितात. विशेषत: तरूण स्त्री-पुरुषांना एकत्र येण्याची व थट्टा-मस्करी करण्याची संधी या सणामुळे मिळते.

आजकाल एखाद्या हौदातील पाण्यात रंग टाकून एकमेकांना त्यात डुबवून हसत खेळत ह्या सणाची मजा लुटली जाते.

या सणासाठी विशेष असे पक्वान्न ठरलेले नाही.



धूलिवंदन
होळीच्या दुस-या दिवशी धूलिवंदन हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरुन होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. असे मानले जाते की या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कै-याही मिळू लागतात. कै-या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात. अंगाला फासतात व नंतर स्नान करतात.

काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुस-या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरु केली आहे. त्यात लहान-मोठे, स्त्रिया-पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात. परंतु रंगपंचमी हा वेगळा सण आहे.



होळी पौर्णिमा (फाल्गुन शुध्द पौर्णिमा)
अशी गोष्ट सांगितली जाते की हिरण्यकश्यपूच्या बहिणीचे नाव होलिका असे होते. अग्नीपासून तुला मुळीच भय रहाणार नाही असा तिला वर प्राप्त झाला होता.या वराचा दुरुपयोग करुन तिने आपला भाचा भक्त प्रल्हाद याला जिवंत जाळण्याकरिता त्याला मांडीवर घेऊन स्वतः धगधगत्या अग्नीत जाऊन बसली. परंतु परिणामाअंती तीच स्वतः जळून खाक झाली व भक्त प्रल्हाद याला काहीही इजा न होता तो सुखरुपपणे अग्नीतून बाहेर पडला. तो दिवस म्हणजे फाल्गुन शुध्द पौर्णिमा.

या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून भोवती रांगोळी काढून मध्ये शेणाच्या गोव-या ठेवून त्यात एरंडाची फांदी ठेवतात. पूजा करण्यापूर्वी ती पेटवतात. पेटल्यानंतर पुरुष हळद-कुंकू अक्षता वगैरेंनी होळीची पूजा करतात. होळी भोवती तीन प्रदक्षिणा घालतात. बायका पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीला हळद-कुंकू वाहून होळीत पुरणाची पोळी टाकतात. ह्या मागील उद्देश हाच असतो की उन्हाळयाच्या दिवसात ठिकठिकाणी आग वगैरे लागते. तेव्हा अग्नीला शांत करण्यासाठी ही पौर्णिमा साजरी केली जाते. तसेच उन्हाळाही कडक भासू नये म्हणून वरीलप्रमाणे अग्नीदेवतेची पूजा करतात. हा सण सर्वत्र संध्याकाळी किंवा रात्री साजरा करतात.

ह्या दिवशी मुख्यतः स्वयंपाकात पुरणपोळी करतात. बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे केला जातो.



महाशिवरात्री (माघ वद्य चतुर्दशी)
महाशिवरात्रीला शंकराची पूजा करुन रुद्राभिषेक व उपवास करतात. या दिवशी बेलाच्या पानाला विशेष महत्त्व असते. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीची जत्राही भरते. एकेका हिंदू देवतांची स्वत:च्या आवडीची फळे-फुले कोणती ते ठरलेले आहे. शंकराला बेलाचे त्रिदल आणि धोत्र्याचे फूल प्रिय आहे.

महाशिवरात्रीविषयी एक कहाणी प्रसिध्द आहे. फार पूर्वी एक शिकारी शिकार करण्याकरितां अरण्यात गेला होता. तो झाडावर दबा धरुन बसला. ते झाड बेलाचे होते. परंतु शिकार करण्याच्या दृष्टीने झाडाच्या फांद्या आड येऊ लागल्या. म्हणून त्याने बेलाची पाने तोडण्यास सुरवात केली. त्या झाडाखाली शंकराची एक पिंड होती. त्या पिंडीवर आपोआप बेल पडू लागला. इतक्या अवधीत पाणी पिण्यासाठी एक हरिणी आली. त्या शिका-याने तिच्यावर नेम धरला. याची हरिणीला चाहूल लागली. तेव्हा तिने शिका-याला सांगितले की माझी लहान बाळे घरी आहेत. त्यांना मी भेटून सूर्योदयापूर्वी पुन्हा इकडे येते. मग माझी शिकार कर. शिका-याने तिचे म्हणणे कबूल केले. हरिणी परत येण्याची तो वाट पाहू लागला. रात्रभर झाडावर राहिल्याने त्याला आपोआपच उपवास घडला. शिका-याला सांगितल्याप्रमाणे हरिणी तेथे हजर झाली.

तिचा प्रामाणिकपणा पाहून शिका-याचे अंतःकरण द्रवले. त्याला तिची दया आली व तिला मारायचे नाही असे त्याने ठरवले. या सर्व गोष्टीमुळे शंकर शिका-यावर प्रसन्न झाले. आणि त्यांनी शिका-याला व हरिणीला विमानांत बसवून उध्दरून नेले. म्हणून जे लोक महाशिवरात्रीचे व्रत करतील ते सदैव सुखी रहातील असे म्हंटले जाते.

या दिवशी सर्वांनी उपवास करण्याची पध्दत आहे. सकाळी स्नान वगैरे करून शंकराला जाऊन बेलाची पाने व कवठ हे फळ शंकराला वाहिले जाते. आंब्याला या सुमारास मोहोर येतो. महाशिवरात्रीला शंकराला आंब्याचा मोहोर वाहण्याचीही प्रथा आहे. हाताने तयार केलेल्या कापसाच्या दो-याच्या ७५० वाती करून शंकराच्या देवळात किंवा घरातील देवापुढे या वाती तुपांत भिजवून लावल्या जातात. उत्तर भारतात या दिवशी खसखस व थंडाई घालून भांग पिण्याची पध्दत आहे. घरोघरी साबुदाणा खिचडी, रताळी, बटाटे यांपासून केलेले जिन्नस वगैरे खाण्याची प्रथा आहे.



मकरसंक्रांत
सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच 'संक्रमण' म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच 'मकर संक्रमण ' असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दरवर्षी हिंदू लोक 'संक्रांत' हा सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यात येतो. हिंदू लोकांचे सण हे चांद्रवर्षानुसार असल्याने सध्या वापरल्या जाणा-या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हिंदूंचा सण हा दरवर्षी विशिष्ट तारखेलाच येईल असे नसते. याला एकमेव अपवाद म्हणजे संक्रांत. संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या १४ तारखेलाच साजरा केला जातो. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.

संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गूळ या पदार्थांना या दिवशी फार महत्त्व असते. सूर्याला व देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखविला जातो.सुवासिनी ह्या दिवशी सवाष्णीला सुगडाचा वसा देतात. सुगडाचा वसा म्हणजे लहान मडक्यांतून गव्हाच्या ओंब्या, गाजर व ऊस यांचे तुकडे, पावटयाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, हरब-याचे घाटे, तिळगुळाच्या वडया, हलवा असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदीकुंकू लावून ती सुवासिनींना देतात. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पिकविलेल्या भाज्या-धान्य वगैरे नमुन्यादाखल इतर शेतकऱ्यांना देऊन , चांगल्या वाणाची चर्चा व्हावी व अधिक चांगले उत्पन्न देणा-या बियाणांविषयी देव-घेव व्हावी हा सुगडाच्या वशामागचा हेतू आहे. संक्रांतीला जेवणात मिष्टान्न म्हणून गुळाची पोळी करतात. गुळाच्या पोळीबरोबर लोणकढे तूप वाढण्याची प्रथा आहे.

संक्रांतीच्यावेळी काळया वस्त्रांना महत्त्व दिले जाते कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळया साडया, काळी झबली अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात.

नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तिळगुळाच्या वडया किंवा तीळ आणि साखरेपासून बनविलेला हलवा देतात. निरांजन, स्टीलच्या लहान डब्या, पिशव्या वगैरेंसारखी एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला 'आवा लुटणे' असे म्हणतात.

सांस्कृतिकदृष्टया या सणाचे फार महत्त्व आहे. लोक एकमेकांना तिळगूळ देतात व 'तिळगुळ घ्या - गोड बोला' असे म्हणतात. आपली जुनी भांडणे-वैरे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठीच संधी असते. ज्यांचे संबंध चांगलेच आहेत, त्यांचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होतो.

संक्रांतीपासून ते रथसप्तमी या तिथीपर्यंत कोणत्याही दिवशी एक वर्षाच्या आतील लहान मुलांचे आणि मुलींचे 'बोरनहाण' केले जाते. यावेळी मुलांची हौस म्हणून त्यांना हलव्याचे दागिने करतात. काळे झबले शिवतात. चुरमुरे, बत्तासे, बोरे, हलवा, तिळाच्या रेवडया वगैरे पदार्थ एकत्र करून लहान बाळाला मधे बसवून त्यावर या खाऊच्या पदार्थांचा वर्षाव केला जातो. घरातील व जवळपासची लहानमुलेही या वेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात.

या सणानिमित्त शुभेच्छापत्रे पाठविण्याचीही पध्दत आहे.



भोगी
पौष महिन्यात , हिंदूंच्या 'संक्रांत' या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १३ जानेवारीला भोगी हा सण दरवर्षी साजरा केला जातो.

भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी वगैरे. देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकेकाईने नहावयास घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते. घरातील सर्व स्त्रियाही ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात.

भोगी देणे - भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.

No comments:

Post a Comment